---Advertisement---
जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर गावाजवळ भरधाव पिकअप वाहनाने उभ्या सेंट्रो कारला दिलेल्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास म्हाडा वसाहती समोर घडली.
छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव येणाऱ्या पिकअप (क्र. एम. एच. १९ सी वाय ९२०२) वाहनाने उभ्या असलेल्या सँट्रो (क्र.एम.एच.०४ एफ ए ८०४१) कारला मागून जोरदार धडक दिल्याने कार जवळ उभ्या असलेल्या अमिनोद्दीन शेख कमारुद्दीन (वय ४७) यांनी जीव वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला धाव घेताच त्यांच्यावरच पिकअप उलटली आणि दबलेल्या अवस्थेतच त्यांचा छातीला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेले सलीम अनिस शेख यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आजूबाजूच्या लोकांनी अमिनोद्दीन शेख यांना पिकअप खालून काढले . त्यांच्यासह जखमी सलीम अनिस शेख यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी तपासणी अंती अमीनोंद्दीन शेख यांना मृत घोषित केले. तसेच दुखापत झालेले सलीम अनिस शेख यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा झाला की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती जणांचा बळी घेणार ? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी संतप्त नागरिकांना शांत करत उद्या सकाळी आपण संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचं आश्वासन दिल. पोलीस प्रशासनाच्या सूचनेचा मान राखून महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमी सलीम अनिस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.









