---Advertisement---
जळगाव : महापालिकेच्या मतदार यादीत ३३ हजार दुबार मतदारांची नावे आढळली असून यात १६ हजार नागरिकांचे नाव दोन ते तीन वेळा नोंदलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून दुबार मतदारांचा शोध घेऊन या मतदारांकडून कोणत्या प्रभागात मतदान करणार याबाबतचे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. ही मोहीम सोमवार (८ डिसेंबर) पासून सुरू केली जाणार असून यासाठी १९ पथकांची नियुक्ती केली आहे.
निवडणूक मार्गदर्शनाखाली आयोगाच्या महापालिका प्रशासनाने मतदार यादीतील प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांच्या नावापुढे चिन्हाकींत करण्यात आले आहे. परंतु दुबार नाव असलेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या दुबार मतदार यादीतील मतदारांचा शोध घेण्याचे काम महापालिका घेणार आहे. यासाठी १९ पथकांची नियुक्त केली असून नियंत्रक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहायक संचालक नगररचना राजेश महाले, मुख्यलेखा परिक्षक विजयकुमार सोनवणे यांची नेमणूक आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शुक्रवारी आदेश काढून केली आहे.
साडे आठ हजार अर्जाचा निपटारा
प्रारूप मतदार यादीवर तब्बल १८ हजार ७५६ अर्ज हरकती व तक्रारी आल्या होत्या. या हरकती व तक्रारींचा निपटारा करून महापालिकेला १० डिसेंबरपर्यंत मतदार यादी अंतिम प्रसिद्ध करायची आहे. त्यानुसार शुक्रवार पर्यंत साडेआठ हजार हरकत व तक्रारींवरील अर्जावर स्थळ पाहणी, पत्ता आदी कागदपत्र तपासणी केली जात आहे.









