---Advertisement---
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावळदबारा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या शेतातील गहू आणि मका पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेत शेतकरी दिनकर मोरे यांचे तीन लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर मोरे यांच्या गट क्रमांक १०८ मधील सुमारे चार एकर शेतीत गहू आणि मका पिके सुगीच्या टप्प्यावर आली होती. मात्र शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज पोलवरील तारा खाली लोंबकळत होत्या. शनिवारी दुपारी वाऱ्याचा वेग वाढल्याने या तारांचा एकमेकांशी संपर्क झाला आणि त्यातून ठिणगी पडून शेतात आग लागली.
ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच दोन एकर गहू आणि दोन एकर मका पीक जळून खाक झाले. याशिवाय शेतातील ठिबक सिंचन व्यवस्थाही पूर्णपणे नष्ट झाली आहे.
विशेष म्हणजे, शेतकरी दिनकर मोरे यांनी यापूर्वीच वाकलेल्या पोल आणि खाली आलेल्या तारांबाबत महावितरण विभागाला माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
स्वतः दिनकर मोरे यांनीही प्रशासनाकडे मदतीची विनंती केली असून, “सुगणीवर आलेले पीक एका क्षणात जळून खाक झाले. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.









