जळगाव : एसटी महामंडळाने १५ टक्के भाडेवाढ लागू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६८ (२) अंतर्गत भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता, ज्याला मंजुरी मिळाली असून ही दरवाढ शनिवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
प्रवाशांमध्ये नाराजी, पण भाडेवाढ गरजेची – गुलाबराव पाटील
सर्वसामान्य प्रवाशांमध्ये या भाडेवाढीबद्दल तीव्र नाराजी दिसत असली तरी, शिवसेना नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाडेवाढीचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, “प्रवाशांनी १०-१५ टक्के भाडेवाढ सहन केली पाहिजे. महाराष्ट्रात ५ हजार नवीन बसेस दाखल होत आहेत. लक्झरी बसेस आणण्याबरोबरच राज्यभरात ई-बसेस सुरू करण्यासाठी हा अतिरिक्त भार महत्त्वाचा आहे.”
पुढे ते म्हणाले की, “जर प्रवाशांना चांगल्या सुविधा हव्या असतील, एसटी बसला खासगी बसेसशी स्पर्धा करायची असेल, तर त्यासाठी भाडेवाढ आवश्यक आहे. सुरक्षिततेच्या आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने या भाडेवाढीचा फायदा होईल.”