फक्त ‘दोन इंजेक्शन’ आणि बीपी नियंत्रणात? रोजच्या बीपीच्या गोळ्यांना मिळणार सुटका? जाणून घ्या कोणतं आहे इंजेक्शन…!

---Advertisement---

 

रोजच्या धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर हा अनेकांसाठी नकळत वाढणारा आणि शांतपणे शरीराला हानी पोहोचवणारा आजार ठरत आहे. एकदा बीपीची गोळी सुरू झाली की ती आयुष्यभर घ्यावी लागते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. गोळी चुकली तर डोकेदुखी, अस्वस्थता, छातीत धडधड किंवा चक्कर त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात बीपी ही केवळ वैद्यकीय समस्या नसून मानसिक ताणाचं कारण बनली आहे.

याच पार्श्वभूमीवर उच्च रक्तदाबाच्या उपचारात मोठी क्रांती घडवू शकणारं संशोधन समोर आलं आहे. जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक The Lancet मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, पारंपरिक दररोज गोळ्या घेण्याऐवजी वर्षातून फक्त दोन इंजेक्शनांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची शक्यता तपासली जात आहे. “New Drug Therapies for Hypertension” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात झिलेबीसिरान या औषधावर विशेष भर देण्यात आला आहे.
झिलेबीसिरान हे स्मॉल इंटरफेअरिंग आरएनए म्हणजेच siRNA तंत्रज्ञानावर आधारित औषध आहे. हे औषध शरीरातील यकृतामध्ये तयार होणाऱ्या अँजिओटेनसिनोजेन या घटकाचे उत्पादन कमी करण्याचे काम करते. अँजिओटेनसिनोजेन हा घटक रक्तदाब वाढवणाऱ्या जैविक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. जेव्हा या घटकाचे प्रमाण कमी होते, तेव्हा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

प्राथमिक क्लिनिकल चाचण्यांमध्ये त्वचेखाली दिलेल्या एका इंजेक्शनचा परिणाम तब्बल सहा महिन्यांपर्यंत टिकून राहिल्याचे आढळले आहे. याचा अर्थ असा की वर्षातून केवळ दोन वेळा इंजेक्शन घेऊन रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांचा सिस्टोलिक रक्तदाब 140 ते 160 च्या पुढे जातो किंवा ज्यांना तीन-चार प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात, अशा रुग्णांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

केवळ झिलेबीसिरानच नव्हे तर Ziltivekimab आणि Selective Aldosterone Modulators या औषधांवरही संशोधन सुरू आहे. ही औषधे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन राखून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने विकसित केली जात आहेत. म्हणजेच भविष्यात रक्तदाबाच्या उपचारात अधिक अचूक आणि मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पद्धतींचा वापर वाढू शकतो.

भारतासारख्या देशासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. जागतिक उच्च रक्तदाब रुग्णसंख्येत भारताचा वाटा सुमारे 17.6 टक्के आहे. देशातील जवळपास 29.8 टक्के प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, तर शहरी भागात हे प्रमाण 33 टक्क्यांहून अधिक आहे. दरवर्षी सुमारे 16 लाख मृत्यू हृदयविकारामुळे होतात आणि त्यामागे अनियंत्रित रक्तदाब हे एक मोठं कारण असतं. देशात अंदाजे 31 कोटींपेक्षा जास्त लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त असल्याचे विविध अहवाल दर्शवतात.

रक्तदाब नियंत्रणासाठी भारतात दरवर्षी हजारो कोटी रुपयांची औषधे विकली जातात. अशा परिस्थितीत वर्षातून दोन इंजेक्शनांची उपचारपद्धती प्रभावी आणि सुरक्षित ठरली, तर ती आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा दिलासा ठरू शकते. मात्र सध्या ही औषधे संशोधन आणि क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. त्यांना अंतिम नियामक मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य वापरासाठी ती उपलब्ध होण्यासाठी अजून काही काळ लागू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, ही उपचारपद्धती अंतिम टप्प्यांत यशस्वी झाली तर रक्तदाब व्यवस्थापनात नवे पर्व सुरू होऊ शकते. रोजच्या गोळ्यांच्या अवलंबित्वातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र तोपर्यंत नियमित औषधोपचार, संतुलित आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन हेच उच्च रक्तदाब नियंत्रणाचे प्रमुख आधार आहेत.

उच्च रक्तदाबावरील या नव्या संशोधनामुळे आशेची किरण नक्कीच दिसत आहे. आता पुढील चाचण्या, सुरक्षिततेचे अहवाल आणि अधिकृत मंजुरी यावरच या क्रांतिकारी उपचारपद्धतीचे भवितव्य अवलंबून असेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---