धुळेकरांसाठी आनंदाची बातमी; धुळे ते पुणे थेट रेल्वे सुरु होणार ? रेल्वे मंत्र्यांना निवेदन सादर…!

---Advertisement---

 

सध्या खासगी बस व ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव भाड्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. त्र्यामुळे  धुळ्याहून पुणे साठी रेलवे सुरु करावी अशी तेथील प्रवाशांची मागणी होती, आणि म्हणून धुळे ते पुणे थेट रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात पोस्टर झळकावत रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यामुळे धुळेकरांची ही मागणी थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.

धुळे-दौंड मार्गे पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना १० फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, धुळे जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २५ लाखांच्या घरात पोहोचली असून प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे हे शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराचे प्रमुख केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रवास होत असतो.

सध्या खासगी बस व ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव भाड्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. सणासुदीच्या काळात वाहतुकीची अपुरी व्यवस्था हीदेखील गंभीर समस्या ठरते. या पार्श्वभूमीवर धुळे-दौंड-पुणे रेल्वे सेवा सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी स्थानिक व विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचा पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात थेट भेट घेऊन ही मागणी लेखी स्वरूपात मांडण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना महाराष्ट्र सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी धुळेकरांच्या वतीने ही मागणी सादर केली.

धुळे जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्ग जात असून पुणे व मुंबईसारख्या शहरांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ व खर्च कमी होऊन सुरक्षित आणि सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या, युवकांना रोजगाराच्या संधी अधिक सुलभ होतील, तसेच शेतमाल व औद्योगिक मालवाहतूक सुलभ होऊन जिल्ह्याच्या औद्योगिक आणि व्यापारी विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मागणी तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---