Crime News: अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरला पती, महिलेने प्रियकराच्या मदतीने केला खून

दापोली : विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे, या प्रेमसंबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने स्वतःच त्याला संपवून टाकण्याची भयानक घटना घडली आहे. दापोलीत अनैतिक संबंधांतून निर्घृण खून करणाऱ्या आरोपी महिला व तिच्या प्रियकराला दापोली पोलिसांनी अटक केली आहे. नेहा बक्कर आणि मंगेश चिंचघरकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे . तर निलेश बक्कर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलेश बाक्कर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हवणे गावात सलूनचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु, ते सोमवारी अचानक बेपत्ता झाले. निलेश याच्या भावाने दापोली पोलीस स्टेशनला भाऊ मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशीच सुरुवात केली. या चौकशी दरम्यान, पोलिसांनी निलेश याच्या पत्नी नेहाकडेही चौकशी केली.

परंतु, ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. यातून पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये काम करत होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेहा आणि तिचा पती हे दोघे हॉटेलमधून एकत्र बाहेर पडत असल्याचे दिसून आले. यातून पोलिसांना संशय आणखीनच बळावला. तसेच नेहा हिने एका बिअर शॉपमधून बिअर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.

शेवटी पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतले. तिची कठोरपणे चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला. प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा आपल्याच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे तिने सांगितले. आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली आणि त्याचा खून केला. यानंतर निलेशचा मृतदेह विहिरीत फेकला असं तिने कबूल केले.

पोलिसांनी नेहाचा प्रियकर संशयित आरोपी मंगेशलाही अटक केली आहे. तो एस. टी. महामंडळाचा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला मुक्कामी आली असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले. निलेश याचा मृततेह विहीरीतून काढून दापोली रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आला. या भयानक हत्याकांडाने गावात खळबळीचे वातावरण आहे.