तळोदा: ‘जुनं बदलून नवं’ देऊन महिलांना लाखोंची फसवणूक, पोलिसांचा तपास सुरू

नंदुरबार :  जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात एका महिलेने जुन्या वस्तू बदलून नव्या वस्तू देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना लाखो रुपयांच्या दागिन्यांसह घरातील संसार उपयोगी वस्तू लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. तळोदा पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यात अमलाड गावात अनिता नावाची एक महिला जुन्या वस्तूंच्या बदल्यात नव्या वस्तू देण्याचे आमिष दाखवत घरोघरी संपर्क करीत होती. तिने प्रथम महिलांकडून कुकर, कढई  डबा, तवा यासारख्या जुन्या वस्तू  घेऊन त्यांना नवीन वस्तू आणून दिला. यासोबातच “आमची कंपनी सोन्या-चांदीचे दागिने सुद्धा नव्या करून देते, अशी थाप मारली.  प्राप्त माहितीनुसार मतीगुंग करण्याचे तंत्र सुद्धा लुबाडणाऱ्या महिलेने वापरले. निरोपाबाई नावाच्या महिलेला आपण घरातून काय काय काढून दिले हे त्यामुळेच लक्षातच आले नाही, असे सांगण्यात आले.

निरोपाबाई विठ्ठल कोळी (रा. आमलाड) यांच्याकडील ४९ हजार २०० रु. कि. सोन्याचे व चांदीचे दागिने, २००० रु. कि. घरातील संसार उपयोगी वस्तु १ पितळी पातेले, ३ पितळी समई, १ पितळी तांब्या, २ पितळी ताटल्या, २ स्टिलचे कुकर, १ खलबत्ता, १ तवा, एक तगारी, १ कडई, १ पितळी परात, १ पितळी हंडा, ७ साडया १००० व ४ गारीचे कवर इतक्या वस्तू घरातून घेऊन गेली.

यासोबतच ही महिला इतर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी इतर महिलांनी इतक्या वस्तू दिल्या तुम्ही पण देऊ शकता असे सांगून फसवणूक करत होती.  दागिने आणि वस्तू घेऊन गेलेली ती महिला नंतर परत आली नाही म्हणून  सर्व महिलांनी पोलीस स्टेशन गाठले.

घडलेल्या या फसवणुकीविषयी तळोदा पोलीस स्टेशनमध्ये सपना विजेंद्र वळवी (वय – ३७ रा. आमलाड तळोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले आहे की, सपना विजेंद्र वळवी  या महिलेकडील ५५ हजार २०० रु. कि. सोन्याचे व चांदीचे दागिने, ५०० रु. कि. ५ साडया तर, अनिताबाबाई संजय वळवी (वय- ३८ रा. आमलाड)  यांच्याकडील ३५ हजार ४०० रु. कि. सोन्याचे व चांदीचे दागिने, ३५००/- रु. कि. घरातील संसार उपयोगी वस्तु १ पितळी हांडा, २ पितळी ताट, २ पितळी ताब्या, २ जर्मनच्या तगारी, १ कुकर, २ अॅल्युमिनयमच्या लहान पातेली, १ अल्युमिनियमचा डब्बा, १ बॅग इ. लंपास केले. असा एकुण १ लाख ४५ हजार ८०० रु. कि. मुद्देमाल या महिलेने लुबाडल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

दरम्यान,  विक्रेता बनून आलेल्या या महिलेचे छायाचित्र एकाने गपचूप मोबाईलमध्ये काढले होते. हा फोटो आता पोलिसांच्या तपास कार्यात महत्वाचा ठरणार आहे. या फोटोच्या मदतीने पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

जुन्याचे नवे करून देण्याची लालच देऊन आणखी किती जणांना फसवण्यात आले याचा शोध पोलीस घेत आहेत. तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय जावरे अधिक तपास करीत आहेत.