---Advertisement---
जळगाव : तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (७ जुलै) रोजी घडला. ही घटना म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली. एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, किशोर आसाराम धनगर (वय ३८, रा. डोमगाव) हे शेती करुनआपल्या परिवाराचे पालनपोषण करीत होते. परंतु, मागील काही वर्षापासून कर्जबाजारी झाले होते. यामुळे ते सतत तणावाखाली राहत होते. यावर्षी लवकर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले होते. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
सोमवारी (७ जुलै) रोजी सकाळी किशोर धनगर हे त्यांच्या राहत्या घरुन जेवण करून शेतात कामासाठी गेले. काम झाल्यानंतर म्हसावद रेल्वे गेटजवळ त्यांनी धावत्या पुष्पक एक्स्प्रेसखाली उडी घेतली. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच, त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. किशोर यांच्या पश्चात आई सुनंदाबाई धनगर, पत्नी उज्ज्वला, ७ वर्षांचा मुलगा व ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. किशोरच्या अचानक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक हेमंत जाधव पुढील तपास करत आहेत