Pune News : पेट्रोल चोरीचा संशय, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Pune Crime New:  क्षुल्लक कारणाने मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आपणास दिसून येत आहे. असाच प्रकार पुणे नऱ्हे येथे घडला आहे. यात एका तरुणाला पेट्रोल चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. दुर्दैवाने उपचारदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.  समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे.

मयत तरुणाचे वडील नेताजी सोपान भगत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या ऑफीससमोर फिर्यादी यांचा मुलगा समर्थ याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत होता.  याचवेळी आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथा बुक्क्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने त्याला मारहाण केली.  यमारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू ओढवला.

माहराणीचा व्हिडीओ सापडला पोलिसांना
समर्थ भगत या तरुणाला झालेल्या जबर मारहाणीनंतर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर शेवटी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. याप्रकरणी आरोपी गौरव संजय कुटे (वय २४ वर्षे) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २० वर्षे) राहुल सोमनाथ लोहार, (वय २३ वर्षे, सर्व राहणार मानाजीनगर, नऱ्हे) या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे सध्या बेपत्ता झाले आहेत. आरोपींनी मारहाण करताना केलेले तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून पोलिसांनी आरोपींचे मोबाइल जप्त केले आहेत.