छत्रपती संभाजीनगर हादरलं! ‘खतरो के खिलाडी’ शोच्या नावाखाली 50 लाख उकळले, मित्रांनीच केला प्राध्यापकाचा खून! जंगलात दृश्यम स्टाईल मृतदेह पुरला….!

---Advertisement---

 

Chhatrapati Sambhajinagar murder : छत्रपती संभाजीनगर शहरात एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘खतरों के खिलाडी’सारखा गेम शो तयार करण्याच्या नावाखाली तब्बल ५० लाख रुपये घेतल्यानंतर पैशांच्या वादातून प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तब्बल ४० दिवसांनी पोलिसांनी तपास लावत तिघा संशयितांना अटक केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०) असे असून ते ज्योतीनगर परिसरातील अभिरिका अपार्टमेंटमध्ये राहत होते. लोंढे हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. ते एकटेच राहत होते, तर त्यांची पत्नी आणि मुले पुण्यात वास्तव्यास आहेत.

५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास राजाभाऊ लोंढे हे काही ओळखीच्या व्यक्तींसोबत पार्टीसाठी गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. यानंतर त्यांच्या भावाने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, लोंढे हे विशाल राठोड, आकाश पवार आणि इतर काही जणांसोबत गेले होते. पोलिसांनी चौकशी केली असता, या व्यक्तींनी लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचे सांगितले होते. या प्रकरणाचा तपास उस्मानपुरा पोलिस ठाण्यासोबतच गुन्हे शाखेकडेही सोपविण्यात आला. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच मोबाईल लोकेशनसह तांत्रिक तपास केला. या तपासात आरोपींच्या सांगण्यात आणि सीसीटीव्ही पुराव्यांमध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक कबुली दिली.   विशाल राठोड हा इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करत होता. त्याने ‘लव्ह अँड डेअर’ तसेच ‘खतरों के खिलाडी’सारखा गेम शो तयार करण्याच्या नावाखाली राजाभाऊ लोंढे यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये घेतले होते.  मात्र, प्रत्यक्षात कोणताही शो सुरू झाला नव्हता. त्यामुळे लोंढे यांनी पैसे परत मिळवण्यासाठी सातत्याने तगादा लावायला सुरुवात केली होती. याच वादातून आरोपींनी खून करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले.

५ फेब्रुवारी रोजी दौलताबाद परिसरातील एका फार्महाऊसवर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत लोंढे यांना भरपूर दारू पाजण्यात आली.
यानंतर ते पूर्णपणे शुद्धीत नसताना आरोपींनी त्यांना गाडीत बसवून साजापूर परिसरात नेले. रेल्वे पुलाजवळ गाडी थांबवून लोंढे यांच्या स्वतःच्या पिस्तुलाने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला.

खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे लपवण्यासाठी मृतदेह गेवराई तांडा परिसरातील जंगलात पुरून ठेवला. लोंढे यांचा शोध लागू नये म्हणून आरोपींनी हा संपूर्ण प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---