महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; ग्राहकांचे खरे सोने बदलून ठेवले बनावट दागिने

---Advertisement---

 

बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात समोर आली आहे. येथील कॅनरा बँकेच्या शाखेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्याच जबाबदार अधिकाऱ्यांनी ग्राहकांनी गहाण ठेवलेले खरे सोने चोरून त्या जागी बनावट सोने ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

​बँकेच्या नियमानुसार दर तीन महिन्यांनी सोन्याच्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) केले जाते. या नियमित प्रक्रियेदरम्यान काही संशयास्पद बाबी आढळल्याने वरिष्ठ पातळीवरून कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले की, बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित असल्याचे मानले जाणारे सोन्याचे दागिने प्रत्यक्षात बनावट आहेत.


​या लुटीमध्ये बँकेचा अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुड्डे याचा मुख्य सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने या बनावट सोन्याला ‘खरे’ असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन या घोटाळ्याला कायदेशीर आधार मिळवून दिला होता. ज्यांच्या हाती बँकेच्या तिजोरीच्या चाव्या असतात, त्यांनीच हा डल्ला मारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

​या गंभीर प्रकरणी बदनापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बँक मॅनेजर आणि सुवर्णकार प्रवीण बुड्डे यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील तिसरा अधिकारी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून बँकेचे इतर काही कर्मचारीही पोलिसांच्या रडारवर आहेत.

​कॅनरा बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेत असा प्रकार घडल्याने बदनापूरसह संपूर्ण जिल्हाभरातील ठेवीदारांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. “बँकेतही जर आमचे पैसे आणि सोने सुरक्षित नसेल, तर दाद कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. या प्रकारानंतर आता आरबीआयकडून (RBI) होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या भीतीने खातेदारांची चिंता अधिकच वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---