सुईच्या भीतीने घेतलं नाही रेबिजचं इंजेक्शन; ६ महिन्यांनी ९ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, महाराष्ट्र हळहळला…!

---Advertisement---

 

महाराष्ट्रात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्याने नख मारल्यानंतर सुईच्या भीतीपोटी रेबिजचं इंजेक्शन न घेतलेल्या ९ वर्षांच्या चिमुरडीचा सहा महिन्यांनी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिम येथील सुबोध नगर हाऊसिंग सोसायटीत राहणारी कशिश सहानी (वय ९) हिचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. ती मदर मेरी शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत होती. सहा महिन्यांपूर्वी कशिश आपल्या आजोबांसोबत रस्त्यावर चालत असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्या हाताला पंजा मारला होता. जखमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती घाबरून रडत असल्याने तिला रेबिजचं इंजेक्शन देण्यात आलं नाही. जखम काही दिवसांत बरी झाल्याने कुटुंबीयांनीही हा विषय दुर्लक्षित केला. परंतु चार दिवसांपूर्वी अचानक तिची प्रकृती बिघडू लागली. तिने अन्न आणि पाणी घेणं बंद केलं. डोळ्यांमध्ये रक्ताच्या गाठी दिसू लागल्या. तातडीने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील उपचारांसाठी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अहवालानुसार कशिशचा मृत्यू ‘रेबिज’ संसर्गामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर सोसायटीसह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित महापालिका हद्दीत हा गंभीर मुद्दा सभेत मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कुत्रा किंवा मांजर चावा घेतल्यास किंवा नख लागल्यास तात्काळ उपचार घेणे अत्यावश्यक आहे. लहान मुलं भीतीपोटी अशा घटना लपवतात, त्यामुळे पालकांनी त्यांच्याशी संवाद ठेवून योग्य वेळी उपचार करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

एका छोट्याशा दुर्लक्षामुळे निष्पाप जीव गमवावा लागल्याची ही घटना सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. वेळेवर उपचार आणि जागरूकता हाच अशा घटनांपासून बचावाचा एकमेव मार्ग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---