---Advertisement---
जळगाव : घरातून बाहेर पडतांना योग्य ती काळजी घेत आपण दाराला कुलूप लावून जात असतो. यातच काही कुटुंबीय कुलुपाची चावी ही आपल्या शेजाऱ्यांकडे देत घरातील इतर सदस्यांची अडचण होणार नाही याकडे लक्ष देत असतात. तर काहीजण घराच्या खिडकीत, दरवाज्यांवर चावी ठेवून किंवा ओळखीच्या जागी लपवून ठेवत घरातील इतर सदस्यांना सोईस्कर होईल याकडे पाहिले जाते.
परंतु, घरातील इतर सदस्यांची अशा प्रक्रारे काळजी घेणे एका तरुणाला चांगलेच महागांत पडले आहे. बंद घराचे चोरट्यांनी चावी लावून कुलूप उघडून घरातून तीन तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---
अंकित सूर्यभान पाटील (वय २४) हे श्याम नगरात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ते खासगी नोकरी करुन उदरनिर्वाह करतात. त्यांचे आई-वडील सोमवारी (३० जून) रोजी बाहेर गावी गेले होते. यामुळे अंकितने दुपारी घराला कुलूप लावून त्याची चावी घराबाहेरच्या रांगोळीच्या डब्यात ठेवली आणि तो कामावर निघून गेला.
याच संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले आणि देवघरातील पडदीवर ठेवलेल्या पिशवीतून तीन तोळे सोन्याची पोत व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असे एकूण ७० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. रात्री अंकित पाटील घरी परतल्यावर ही चोरी झाल्याचे त्यांना समजले. अंकित पाटील यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करत आहेत.