---Advertisement---
Dharmendra Passed Away : चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर अली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्येष्ठ अभिनेते यांना काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. ते वयोमानाशी संबंधित आजारांशी झुंजत होते.
आज सोमवारी दुपारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली, त्यानंतर एक रुग्णवाहिका घरात येताना दिसली. आता, त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे.
धर्मेंद्र हे जवळजवळ ६५ वर्षे बॉलिवूडवर राज्य करणारे अभिनेते होते. त्यांनी १९६० मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि “शोले”, “सीता और गीता”, “मेरा गाव मेर देश”, “लोहा” आणि इतर अनेक उत्कृष्ट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तथापि, आता त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली गावात झाला. या छोट्याशा गावातून ते बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक बनले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांच्या पडद्यावरील अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.









