---Advertisement---
लवकरच जळगाव विमानतळावरून आणखी एका महत्त्वाच्या शहरासाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. जळगावहून इंदूरकडे जाणारी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली अंतिम टप्प्यात असून, ‘फ्लाय ९१’ ही विमान कंपनी या मार्गावर उड्डाण सुरू करण्याची तयारी करत आहे.
आतापर्यंत जळगाव विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा आणि हैदराबादसाठी नियमित विमानसेवा सुरू असून, या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता इंदूरची भर पडणार असल्याने जळगावचे हवाई जाळे आणखी विस्तारणार आहे.
सध्या जळगावहून इंदूरसाठी थेट रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खासगी बस किंवा वैयक्तिक वाहनांचा आधार घ्यावा लागतो. मात्र विमानसेवा सुरू झाल्यास काही तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.
जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने नव्या विमान कंपन्यांना येथे सेवा सुरू करणे अधिक सोयीचे झाले आहे. याच सुविधांचा फायदा घेत ‘फ्लाय ९१’ कंपनीकडून जळगाव–इंदूर मार्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात नागरी विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित समितीचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी माहिती देत, लवकरच या सेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाहीर होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यास शिक्षण, उपचार आणि व्यापारासाठी इंदूरला जाणाऱ्या जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार असून, जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.









