---Advertisement---
भुसावळ शहरातील तापी नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीत मृतांच्या अस्थींवरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर त्या ठिकाणी अस्थी मिळून न आल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. सुरुवातीला अस्थी चोरीचा संशय व्यक्त करत मृत महिलेचे नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलीस चौकशीत धक्कादायक वास्तव उघड झाले. वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराच्या बाजूलाच एका वृद्ध व्यक्तीचेही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र अंत्यसंस्काराच्या वेळी गैरहजर असलेला मृत व्यक्तीचा मुलगा उशिरा स्मशानभूमीत पोहोचल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार नेमके कुठल्या जागी झाले, याबाबत त्याला माहिती नव्हती. त्यामुळे चुकून वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या अस्थी समजून तापी नदीत विसर्जित करण्यात आल्या.
हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित तरुणाने मृत वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांची माफी मागितली. मात्र या घटनेमुळे स्मशानभूमीतील नियोजनाच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणतीही ठोस व्यवस्था, नोंदणी किंवा ओळख प्रणाली नसल्यानेच हा गोंधळ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, प्रत्येक अंत्यसंस्काराच्या ठिकाणी क्रमांक देण्यात यावा तसेच मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची अधिकृत नोंद ठेवावी, अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









