राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शशिकांत शिंदेंचं मोठ विधान, म्हणाले…

---Advertisement---

 

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. शरद पवार गटाकडून असा दावा केला जात आहे की, अजित पवार हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र आणण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती आणि त्याबाबत काही प्रमाणात सहमतीही झाली होती. मात्र अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी या दाव्यांना स्पष्ट नकार दिला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली होती आणि त्यांच्या पक्षातील अनेकांनी त्याची कबुली दिली आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर या विषयावर अनावश्यक वाद निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्हीच विलीनीकरणासाठी आग्रही आहोत, असा गैरसमज पसरवला जात आहे. आमच्याकडून कोणतीही घाई करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेबाबत आम्ही जे बोललो ते शपथपूर्वक सत्य म्हणूनच मांडले. त्यानंतर या विषयावर आम्ही मौन बाळगले आहे,” असे शिंदे म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, सध्या तरी या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्याचा त्यांचा पक्षाचा विचार नाही.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांचा विलीनीकरणाला विरोध आहे का, असा प्रश्न विचारला असता शिंदे यांनी थेट भाष्य टाळले. “प्रत्येकाने आपली भूमिका स्वतः स्पष्ट करावी. त्याबाबत मी काही बोलणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले. सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विलीनीकरणानंतर एनडीएसोबत जाण्याचा विचार होता का, किंवा अजित पवार एनडीएमधून बाहेर पडणार होते का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, अशा कोणत्याही निर्णयाचा अंतिम निष्कर्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतरच काढला जाणार होता. “आता त्यांच्या मनात नेमके काय होते यावर भाष्य करणे योग्य नाही. पुढे एनडीएसोबत राहायचे की नाही, हा निर्णय सुनेत्रा पवार यांचा असेल. तो अधिकार त्यांच्याकडे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---