---Advertisement---
मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील द्वारकापुरी परिसरात घडलेल्या एका तरुणीच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी पियुष धामनोतिया याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
१० फेब्रुवारी रोजी आरोपी आणि पीडित तरुणी एकत्र तिच्या घरी जाताना सीसीटीव्हीत दिसले. मात्र सुमारे अडीच तासांनी आरोपी एकटाच बॅग घेऊन बाहेर पडताना दिसतो. याच फुटेजवरून पोलिसांना संशय आला आणि तपासाची दिशा स्पष्ट झाली.
प्राथमिक चौकशीनुसार, आरोपीने तरुणीकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने तिचे हात दोरीने बांधले, डोळे झाकले आणि ‘गिफ्ट’ देण्याचे नाटक केले. मात्र, विरोध केल्याने त्याने तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडल्यावर छातीवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे
प्रेयसीच्या मृतदेहाशेजारी बसून आरोपीचे मद्यपान:
धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तत्काळ पळून गेला नाही. तो बाहेर जाऊन मद्य आणून मृतदेहाशेजारी बसून मद्यपान करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. तसेच मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुलीही त्याने दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
‘अघोरी कृत्य’ करून आत्मा बोलावण्याचा प्रयत्न:
गुन्ह्यानंतर आरोपी पनवेलमार्गे मुंबईत गेला. तिथे एका हॉटेलमध्ये राहत असताना त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीचा मोबाईल फोडून टाकल्याचेही समोर आले आहे. पनवेल परिसरात एका निर्जन ठिकाणी अगरबत्ती लावून आणि यूट्यूबवर ‘आत्मा कसा बोलवायचा’ यासंदर्भातील व्हिडिओ पाहून काही अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आरोपीने केला आहे. मृत तरुणीच्या आत्म्याशी बोलून माफी मागायची होती, असे त्याने चौकशीत सांगितले.
या प्रकरणात सायबर गुन्ह्याचाही गंभीर पैलू समोर आला आहे. आरोपीने तरुणीचे काही खाजगी व्हिडिओ कॉलेज ग्रुपवर शेअर केल्याचे तसेच तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केल्याचे समजते. संशय आणि असुरक्षिततेतून हे कृत्य केल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.
आरोपीचे मानसिक आजाराचे नाटक?
इंदूर पोलिसांच्या मते, आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा आव आणत आहे. मात्र, गुन्ह्याचे नियोजन आणि घटनाक्रम पाहता हा गुन्हा थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचा संशय बळावत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
आरोपीविरोधात खून, पुरावे नष्ट करणे, लैंगिक अत्याचार आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाई होणार आहे.









