---Advertisement---
भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील एका महिलेवर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजे नंतर जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेवर जीवघेणा हल्ला झाला असून जखमी महिलेवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित महिला व संशयित अस्लम शेख यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे सांगितले जात आहे. या वादातून संशयिताने हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी हुकसदृश वस्तूने महिलेवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत महिलेच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस पाटील व इतरांनी जखमी महिलेला उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने जखमी महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, घटनेनंतर संशयित आरोपी अस्लम शेख घटनास्थळावरून पळून गेल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे
या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.









