मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या दहावी उत्तीर्ण १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून मृत्यू; अकरावीच्या प्रवेशाआधीच काळाचा घाला…!

---Advertisement---

 

भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात राहणारा आणि नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रतीक अनिल महाजन (वय १६) याचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अकरावीत प्रवेश घेऊन पुढील शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या प्रतीकच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी सकाळी प्रतीक महाजन आणि त्याचा मित्र यश लोखंडे (वय २१) हे कुटुंबीयांना न सांगता तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. शेळगाव बॅरेज परिसरातील बुडालेल्या लहान पुलाजवळ पोहोचल्यानंतर प्रतीक प्रथम पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडू लागला.

घटना लक्षात येताच मित्र यश लोखंडे याने मदतीसाठी आरडाओरड केली. जवळील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी नगरसेवक नितीन धांडे आणि प्रतीकचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

स्थानिक अनुभवी पोहणाऱ्यांच्या सुमारे दहा जणांच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर प्रतीकचा शोध लागला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे यांनी पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

प्रतीक हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील खासगी दुकानात नोकरी करतात, तर आई मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. त्याला एक लहान बहीण असून त्याच्या निधनामुळे संपूर्ण महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---