---Advertisement---
‘आपल्या जळगाव शहरात हिंदी चे फार मोठे राष्ट्रीय स्तरावरचे साहित्यिक राहत होते आणि त्यांचं नाव होतं डॉ. शंकर पुणतांबेकर…’ हे असं आपल्यालाच नंतरच्या पीढीला सांगावं लागेल, कारण राष्ट्रीय पातळीवर सुपरिचित असून सुद्धा केवळ त्यांच्या प्रसिध्दीपराङ्मुख स्वभावामुळे आणि दिव्याखालच्या अंधारा सारखी त्यांची उपेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या आपल्याच कर्मभूमीत त्यांच्या वाट्याला यावी हे त्यांचं नव्हे तर आपलंच दुर्भाग्य ! कारण डॉ. शंकर पुणतांबेकर अतिशय गहिऱ्या संवेदनांनी भरलेले आणि भारलेले उंचीचे साहित्यिक होते हे जळगावकरांना पूर्णतः कळलंच नाही मात्र साहित्यिक अथवा अन्य अकादमीक देशभरात कुठल्या कार्यक्रमात जाणं झालं आणि कोणी विचारलं आपण कोठून आलात ?’ तर ‘जळगाव ‘सांगितल्यावर प्रसन्न प्रतिक्रिया समोरून यायची ‘अच्छा, म्हणजे डॉ. शंकर पुणतांबेकरांचं जळगांव !” तेव्हा आपण ही जळगावकर असल्याच्या अभिमानाची जाणीव व्हायची. पुणतांबेकर सर गहिऱ्या मनाचे तसेच निरपेक्ष भाव-पुरुष होते, त्यामुळे त्यांना आपल्या उपेक्षेचा विषाद कधीच वाटला नाही. मात्र, त्यांच्या सहवासातील असून सुध्दा आपण त्यांच्या पुरेशा सन्मानाचे लाभार्थी होऊ शकलो नाहीत’ ही खंत ‘हा हन्त..’. म्हणत आपणां सर्वांच्या वाटेवर उभी आहे याची जाणीव जरा आपल्या मनांत डोकावली तरी भरून पावल्यासारखं होईल.
पुणतांबेकर सरांचा जन्म २६ मे १९२५चा मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यातील कुंभराज येथला आणि शिक्षण विदिशा व आग्रा येथून झालेलं असलं तरी त्यांचं आपलं नाव शंकर पुणतांबेकर म्हटल्यावर सर महाराष्ट्राबाहेरचे नसावेतच असं वाटावं इतकं त्यांचं व्यक्तीमत्व मराठी मातीशी अन् मराठी भाषेशी एकरूप होतं. त्यांच्या वर्तनातला ‘माणूस’ पूर्णतः महाराष्ट्रीयन आणि वाणीत मराठी भाषा अस्सल होती. आज त्यांच्यासाठी ‘होते’ हे भूतकाळवाचक सहाय्यक क्रियापद वापरावं लागत आहे हे सुध्दा आपले आणि नव्या पीढीचे दुर्दैवंच ! ३१ जानेवारी २०१६ ला पुणतांबेकर सर आपल्यातून कायमचे निघुन गेलेत ज्याला एक दशक पूर्ण झालं आणि आजच्या या कालावधीत सरांच्या जन्माला शंभर वर्षे म्हणजे एक शतक पूर्ण झालेलं आहे. जन्मशताब्दीच्या या निमित्ताला अनुसरून पुणतांबेकर सरांच्या व्यक्तीत्वाला आणि कृतित्वाला स्मरण करून उजाळा देण्यासाठी अन् आठवणीं जागृत करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एका संवेदनशील सत् साहित्यिकाचे आणि तत्वज्ञानी चिंतकाचे हितचिंतक, अनुयायी म्हणून एकत्र येऊन (आज) दोन मार्च रोजी सकाळी १० वाजता व.वा. वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात त्यांच्या स्मृतिंना अभिवादन करावं हा या प्रपंचाचा हेतू आणि अपेक्षा !
डॉ.शंकर पुणतांबेकरसरांनी वयाच्या नवद्दी पर्यंत हिंदीत विपुल साहित्य लेखन केले आहे. जळगावच्या मु.जे. महाविद्यालयात दीर्घ काळ हिंदीचे प्राध्यापक म्हणून आणि विभाग प्रमुख म्हणून सेवा केली आहे. सेवा निवृत्तीनंतरही ३१ वर्षे जीवन त्यांच्या वाट्याला आलं. या काळात त्यांनी विपुल मौलिक साहित्य-निर्मिती केली. ज्यामधुन त्यांचा 30-3५ पुस्तकांचा प्रपंच प्रगट होतो. यात त्यांच्या प्रज्ञापूर्ण आणि प्रखर व्यंग्यात्मक अनेक रचना- कथा, कादंबऱ्या, निबंध, नाटकं इत्यादी तर आहेतच, याव्यतिरिक्त त्यांनी सतत बारा वर्षांची तपश्चर्या करत लिहिलेला व निर्मिलेला ग्रंथ म्हणजे ‘व्यंग्य अमरकोश ‘ज्याला कोशवाङ्गमयातील आश्चर्यच म्हणावे लागेल. ‘बिखरे पन्ने’ सरांच्या आयुष्यातील अंतिम एक-दोन वर्षात लिहिलेली ‘आत्मकथा ‘म्हणजे त्यांची अप्रतिम अंतिम साहित्यकृती, संपूर्ण वाङ्गमय-विश्वातील अप्रतिम आत्मकथा! अगदी जगावेगळी आणि अत्युच्च श्रेणीतील!! व्यंग्य अमरकोश’ व ‘बिखरे पन्ने’ या दोन्हीं रचना भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचा दर्जा आणि गौरव अधिक उंचावणाऱ्या अवश्य ठरल्या असत्या, पण ‘ज्ञानपीठ पुरस्कारंच या अमर रचनांपर्यंत पोहचण्यात अपयशी व असमर्थ ठरला हे त्या ‘ज्ञानपीठाचं दुर्दैवंच म्हणावं लागेल.
आपल्या उत्तरआयुष्यात पुणतांबेकर सर साहित्यसृजना सोबतच जवळ जवळ पंचवीस वर्षे भारतातील अग्रगण्य सांस्कृतिक संगठन ‘संस्कार भारती’ चे जळगांव शहर अध्यक्ष म्हणून अखंडपणे कार्यरत होते हे आपल्या संस्कारभारती’चं भाग्य ! ते स्वयंप्रेरित आणि स्वयंप्रकाशित होते मात्र स्वप्रचारक अजिबात नव्हते. त्यांच्या कर्तृत्वात त्यांचं आपल्यासाठी काहीच नव्हतं पण त्यांच्या कृतीत्वातून अभिव्यक्त झालेली सगळ्यांची सुख-दुःख, वेदना-संवेदना ह्या त्यांच्या होत्या. त्यांनी सुख-दुःख आणि वेदना-संवेदनांचे सार्वजनिकरण करून सगळ्यांच्या हिताचा भाव जपत ‘सहितस्य भावः साहित्यम्’ या न्यायाने साहित्यसेवा केली. त्यांचं आपलं काहिच नव्हतं म्हणजे अगदी उत्तर आयुष्यात वाट्याला आलेलं वार्धक्य सुद्धा! त्यांनी आपल्या वार्धक्याचंही सार्वजनिकरण करून चिंतनाच्या अत्युच्च स्तरावर जाऊन आपल्या ‘बिखरे पन्ने ‘या साहित्यकृतितून अखिल विश्वातील सकल वृध्दांसाठी सकारात्मक संदेश प्रसारित केला जो वाचुन वृद्धत्वाला पोहचलेल्या आणि कंटाळलेल्या सगळ्या वार्धक्य-पीडीतांच्या डोळ्यातील उपेक्षित असण्याचे आणि वंचितपणाचे भाव कोठल्या कोठे विरून जातील. या आत्मकथेत सकल वार्धक्याबद्दल श्रध्देय पुणतांबेकरसरांनी म्हटले आहे “बुढापा कुरूप है, पर यह दुनिया सुंदर बुढापे से है। ज्ञान-विज्ञान-दर्शन बुढ़ापेने ही तो दिया। बुढापा दुर्बल है, पर दुनिया बलशाली बुढ़ापेसे ही तो है! चरित्र, संस्कार, धर्म बुढ़ापेने ही तो दिये।” जगातल्या सगळ्या वृध्दांना आपल्या अनुपयुक्तपणाच्या विषाद-भावनेतून मुक्त करणारा पुणतांबेकर सरांनी दिलेला हा मोलाचा मूलमंत्र आहे! म्हणूनच मी पुणतांबेकर सरांना केवळ लेखन करणारा साहित्यिक, लेखक एवढंच किंवा फक्त व्यंग्यकार इतकंच मानत नसून त्यांना जीवनदर्शी तत्वज्ञानी मानतो आणि विनम्र अभिवादनासह माझ्या भावना श्रद्धेय, स्वर्गीय पुणतांबेकरजींच्या स्मृतिंना समर्पित करतो!
डॉ.सुभाष महाले, भ्रमणध्वनी -9422618221









