महिलांनो सावधान : जळगावात ‘भांडी योजना’च्या नावाखाली सुशिक्षित टोळी सक्रिय; नागरिकांची लूट सुरू

---Advertisement---

 

शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘भांडी योजना’च्या नावाखाली महिलांची फसवणूक करणारी एक सुशिक्षित टोळी सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही टोळी सर्वसामान्य गृहिणींना लक्ष्य करत असून अर्जापासून ते कार्ड मिळवून देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे.
मात्र या प्रक्रियेसाठी संबंधित महिलांकडून प्रथम १,००० रुपये घेतले जातात आणि नंतर कार्ड मिळण्याची तारीख सांगून आणखी ५०० रुपये वसूल केले जातात. ‘आम्ही तुमचे काम करून दिले’ असे सांगत विश्वास निर्माण केला जातो. विशेष म्हणजे, हीच प्रक्रिया एखाद्या सायबर कॅफेमध्ये केवळ ३०० ते ४०० रुपयांत पूर्ण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे.


योजनेचा लाभ गरजूंऐवजी अपात्रांपर्यंत
शासनाने ही योजना मूळतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगार वर्गासाठी सुरू केली असली, तरी जळगावात अनेक अपात्र महिलादेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे. दलालांच्या सक्रियतेमुळे योजनेची खरी माहिती नसलेल्या महिलांना चुकीच्या मार्गाने सहभागी करून घेतले जात आहे.


‘शासनाची योजना, दलालांची कमाई’
राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असताना, त्यांच्या अंमलबजावणीत दलालांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे. ‘भांडी योजना’तही शासनाचे नाव वापरून दलाल मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहेत. नुकत्याच एका प्रकरणात १०० रुपयांची लाच घेतल्याने खळबळ उडाली होती, तर दुसरीकडे अशा टोळ्या बिनधास्तपणे नागरिकांकडून पैसे वसूल करत आहेत.


नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
कोणतीही शासकीय योजना अधिकृत संकेतस्थळ किंवा कार्यालयातूनच तपासावी
अनोळखी व्यक्तींना पैसे देणे टाळावे
अर्ज प्रक्रिया स्वतः किंवा अधिकृत केंद्रातूनच करावी
संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी
या प्रकारामुळे जळगावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---