---Advertisement---
होळीच्या आनंदोत्सवाच्या दिवशी नागपुरात घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण शहर हादरवून गेली आहे. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नागपूरमधील कोराडी परिसरात घडली असून या अमानुष प्रकारात ओम हरीश वांगे हा चिमुकला गंभीररीत्या भाजला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी ओम आपल्या घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले उकळते पाणी बादलीत भरून घरात नेत होत्या. खेळता खेळता ओमच्या पिचकारीतील थोडासा रंग आजीच्या अंगावर उडाला. या किरकोळ कारणामुळे आजीचा संताप अनावर झाल्याचे सांगितले जाते.
रागाच्या भरात त्यांनी कोणताही विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर ओतली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारी आणि नातेवाईक धावून आले. तत्काळ त्याच्या अंगावर थंड पाणी टाकण्यात आले, मात्र तोपर्यंत कमरेखालील भाग गंभीररीत्या भाजला गेला होता. ओमला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार तो सुमारे ४५ टक्के भाजला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये आजीने बादलीभर उकळते पाणी मुलावर ओतल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूर शहरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सणाच्या दिवशी घडलेल्या या अमानुष घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.









