---Advertisement---
बिहारच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज्यसभेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होणार असून बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेले नीतीश कुमार आता सक्रिय राज्यकारभारातून दूर होत दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी राज्यसभेत जाण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर एनडीएमधील सत्ता वाटपाचे नवे समीकरण पुढे आले आहे.
बिहारच्या राजकारणात भाजपकडे मुख्यमंत्रीपद?
हिंदी भाषिक राज्यांमध्ये बिहार हे असे राज्य होते जिथे अद्याप भाजपचा मुख्यमंत्री झालेला नव्हता. आता एनडीएच्या सूत्रांनुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असून जनता दल (युनायटेड) यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नीतीश कुमार यांनी सन्मानाने पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निशांत कुमार यांची एंट्री?
नीतीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार हे आता सक्रिय राजकारणात येण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांची मंत्रिमंडळात एंट्री होऊ शकते. उपमुख्यमंत्रीपदासाठी ते आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
जेडीयूच्या कोट्यातून दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विजय चौधरी आणि अशोक चौधरी यांची नावेही चर्चेत आहेत. अशोक चौधरी हे दलित चेहरा म्हणून पक्षासाठी महत्त्वाचे मानले जातात.
नीतीश कुमारांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपचा मुख्यमंत्री आणि जेडीयूचा उपमुख्यमंत्री अशी नवी सत्ता रचना राज्यात स्थिरावते का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.









