जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी असलेल्या कारची काच फोडली; बंद कॅमेऱ्यांमुळे तपासास अडथळा, नशिराबादकरांचा प्रशासनाला जाब…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी असलेल्या एका कारची अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री दगड मारून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बंद पडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मारुती सुझुकी ऑल्टो कार जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी होती. वाहनाचे मालक रामचंद्र दिगंबर देशपांडे यांनी सकाळी वाहनाजवळ गेल्यानंतर कारची मागील काच फुटलेली असल्याचे पाहिले. परिसरात काचेचे तुकडे विखुरलेले आढळून आले. अज्ञात व्यक्तींनी जाणूनबुजून दगड मारून वाहनाची तोडफोड केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, संबंधित वाहनाच्या शेजारी आणखी एक चारचाकी वाहन उभे असतानाही केवळ याच वाहनाला लक्ष्य करण्यात आल्याने या घटनेमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

या प्रकरणी रामचंद्र देशपांडे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषदेकडून लाखो रुपयांचा खर्च करून शहरातील प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नियमित देखभाल आणि सर्विसिंगच्या अभावामुळे अनेक कॅमेरे निकामी झाले असून काही ठिकाणी केबल तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही कॅमेरे केवळ खांबांवर लटकताना दिसत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

नशिराबाद शहरातील नागरिकांच्या मते, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असती तर कारची तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे अधिक सोपे झाले असते. मात्र कॅमेरे बंद असल्यामुळे तपास प्रक्रियेलाही अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---