साकळी फाट्याजवळ दुचाकीला ट्रॅक्टरचा कट मारल्याच्या वादातून मारहाण; फावड्याने डोक्यात वार; चौघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा….!

---Advertisement---

 

यावल तालुक्यातील पथराळे गावाच्या शिवारातील साकळी फाट्याजवळ पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीला ट्रॅक्टरने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण करत फावड्याने डोक्यात वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान मंगल सोनवणे (वय 46, रा. पथराळे, ता. यावल) हे 6 जून रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतासमोरील रस्त्यावरून दुचाकीने जात होते. यावेळी पूर्वीच्या वादातून प्रवीण उर्फ गोट्या तुकाराम सोनवणे याने ट्रॅक्टरद्वारे त्यांच्या दुचाकीला कट मारला.

याबाबत “कट का मारला?” असा जाब विचारताच प्रवीण उर्फ गोट्या सोनवणे, विशाल राजेंद्र सोनवणे, प्रशांत शरद सोनवणे आणि सचिन मधुकर तायडे (सर्व रा. शिरसाड, ता. यावल) यांनी समाधान सोनवणे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फावड्याने त्यांच्या डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी समाधान सोनवणे यांच्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---