---Advertisement---
चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील जामा मस्जिदीत एका तरुणाने प्रवेश करून गैरप्रकार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणाला अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
१५ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवतांडा येथील एक तरुण घाट रोडवरील जामा मस्जिदीत प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावर गेला. त्यावेळी मस्जिदीत नमाज पठण सुरू होते. उपस्थित असलेल्या काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित तरुणाने तेथून पळ काढल्याचे सांगितले जात आहे.
घटनेदरम्यान त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या भावाला काही युवकांनी ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत संशयित तरुणाचा शोध घेतला. शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने कारवाई करत संबंधिताला अल्पावधीत ताब्यात घेतले.
घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर जामा मस्जिद परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. उपस्थितांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी मस्जिद ट्रस्टी, समाजातील मान्यवर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक तसेच विविध शाखांतील अधिकारी व कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता.
चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले. पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









