एरंडोल शहरात किरकोळ वादाचे हिंसक रूप; घरावर हल्ला, मोटारसायकलची तोडफोड, 16 संशयितांविरोधात गुन्हा; 4 जण अटकेत…!

---Advertisement---

 

एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण झाल्याने पंधरा ते वीस युवकांच्या टोळक्याने एका घरावर हल्ला करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी घराचा दरवाजा फोडत दगडफेक केली, घरातील साहित्याची नासधूस केली तसेच बाहेर उभी असलेली मोटारसायकलही फोडून टाकली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एरंडोल पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी प्रेमराज यशवंत पाटील आणि आरिफ शेख माजीद शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. एरंडोल शहरातील काही मान्यवरांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. मात्र रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास आरिफ शेख याच्यासह 15 ते 20 युवकांनी प्रेमराज पाटील यांच्या घरावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला.

हल्लेखोरांनी घराचा दरवाजा तोडून दगडफेक केली तसेच घरातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी घरातील मीनाबाई लक्ष्मण पाटील, महेंद्र पाटील, माधुरी पाटील आणि स्वाती प्रेमराज पाटील यांना मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी मीनाबाई लक्ष्मण पाटील यांच्या तक्रारीवरून आरिफ शेख माजीद शेख, मुन्ना शेख अन्वर, इरफान शेख उर्फ गोळ्या, जुम्मा (पूर्ण नाव अज्ञात), फारुख मिस्तरी, राजू पिंजारी, इम्रान उर्फ चाटी, फिरोज मिस्तरी, आसिफ शेख फावड्या, सलीम शेख मुख्तार, तौफिक मुजावर, भुरा शेख अब्दुल, अब्बास शेख अब्दुल, मोबीन युनुस शेख आणि अज्जू भंगारवाले यांच्यासह एकूण 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरिफ शेख माजीद शेख, आसिफ शेख जब्बार शेख, अब्बास शेख अब्दुल शेख आणि इरफान शेख उर्फ गोल्या रईस शेख या चार संशयितांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेनंतर गांधीपुरा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पारोळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनीही रात्रभर शहरात ठाण मांडून परिस्थितीवर लक्ष ठेवले. बुधवारी सकाळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---