‘संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस’; शिवसेना खासदारांच्या फुटीनंतर गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका….

---Advertisement---

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या राजकीय घडामोडींनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “संजय राऊत यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अधोगती सुरू झाली आहे. पक्षातील असंतोष आणि आज निर्माण झालेली परिस्थिती याला त्यांची कार्यपद्धती कारणीभूत आहे.”

यावेळी त्यांनी राऊत यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. “संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे माणूस आहेत. त्यांच्या पायाचा हा पांढरेपणा काळा कधी होणार, हे आता पाहावे लागेल,” अशा शब्दांत त्यांनी खोचक टोला लगावला.

दरम्यान, शिवसेनेतील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींनंतर हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, या पक्षफुटीबाबत प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांवर जोरदार टीका केली आणि शिवसेना पूर्वीही संकटातून बाहेर पडल्याचे सांगत कार्यकर्त्यांना खंबीर राहण्याचे आवाहन केले.

“शिवसेना यापूर्वीही मोठ्या संकटांचा सामना करून उभी राहिली आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल,” असा इशाराही राऊत यांनी दिला.

शिवसेनेतील या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात या संघर्षाची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---