---Advertisement---
पंढरपूर (प्रतिनिधी) : अधिकमास कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती या कालावधीत मंदिर समितीस ९ कोटी ४६ लाख २८ हजार रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील अधिकमासाच्या तुलनेत यंदा उत्पन्नात २ कोटी २६ लाख ५८ हजार ७१६ रुपये वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली. तसेच भाविकांना अधिक चांगल्या व पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समिती सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
अधिकमास काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने पंढरपुरात हजेरी लावली. १७ मे ते २५ जून या कालावधीत सुमारे ५ लाख ३० हजार ६२० भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले, तर सुमारे ९ लाख ३० हजार ६८ भाविकांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे मंदिर परिसरात अधिक महिनाभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
श्रद्धेपोटी भाविकांनी श्रींच्या चरणी मोठ्या प्रमाणावर देणग्या तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले. अधिकमासात भाविकांकडून श्रींच्या चरणी ८१ लाख ७२ हजार ६७९ रुपये अर्पण करण्यात आले. याशिवाय देणगीद्वारे २ कोटी ३ लाख ५५ हजार १८० रुपये प्राप्त झाले.
मंदिर समितीला विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले. त्यामध्ये लाडू प्रसाद विक्रीतून ७२ लाख ३३ हजार ७०० रुपये, भक्तनिवासातून १ कोटी २५ लाख ५६ हजार ७२३ रुपये, पूजाविधीमधून ११ लाख ३ हजार ४२७ रुपये, हुंडीपेटीतून २ कोटी ५३ लाख ८२ हजार ३४४ रुपये, तसेच सोने-चांदी अर्पणातून १ कोटी ७८ लाख ४३ हजार ९६७ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. याशिवाय फोटो विक्री, महावस्त्रे, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी विविध माध्यमांतून सुमारे १९ लाख ८१ हजार १३ रुपये उत्पन्न मिळाले.
मागील अधिकमासात मंदिर समितीस ७ कोटी १९ लाख ६९ हजार ४३७ रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या अधिकमासात भाविकांची संख्या आणि देणग्यांमध्ये वाढ झाल्याने उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीव उत्पन्नाचा उपयोग मंदिर परिसरातील सुविधा, दर्शन व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.
अधिकमासात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पंढरपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाला पुन्हा अधोरेखित करणारा हा कालावधी ठरला असून, लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेत भक्तीचा अद्वितीय सोहळा अनुभवला.









