---Advertisement---
जळगाव : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जळगाव शहरावरही दिसू लागला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना गॅस मिळण्यासाठी चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
गॅस बुकिंग केल्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी सिलिंडर घरपोच मिळत असतो. मात्र सध्या पुरवठा कमी झाल्याने अनेक ग्राहकांना तीन ते चार दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ग्राहकांनी ४ मार्च रोजी गॅस बुकिंग केले असतानाही ७ मार्चपर्यंत सिलिंडर मिळाला नसल्याचे सांगितले आहे.
गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या नावाने बिल तयार झाल्यानंतर मेसेजही पाठवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात सिलिंडर न आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होत आहे. सिलिंडर उशिरा मिळत असल्याने वितरणाची प्रतीक्षा यादीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे एलपीजी निर्मिती व पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. जळगाव शहरात दररोज साधारण चार ते पाच हजार सिलिंडर वितरित केले जातात. एका एजन्सीकडून सरासरी ७०० ते ८०० सिलिंडर दिले जातात. मात्र सध्या प्रत्येक एजन्सीला केवळ ३०० सिलिंडरच मिळत असल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
सिलिंडरच्या तुटवड्यासोबतच दरवाढीचाही फटका ग्राहकांना बसला आहे. शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ८५८ रुपये ५० पैशांना मिळणारा सिलिंडर आता ९१८ रुपये ५० पैशांवर पोहोचला आहे.
तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी घाईघाईने बुकिंग करू नये, यासाठी कंपन्यांनी ‘लॉक सिस्टिम’ लागू केली आहे. एका बुकिंगनंतर २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलिंडर बुक करता येणार असल्याची माहिती गॅस एजन्सी चालक दिलीप चौबे यांनी दिली.
दरम्यान, ज्या ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहेत त्यांची तात्पुरती गरज भागत असली तरी ज्या ग्राहकांकडे एकच सिलिंडर आहे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वयंपाकापासून दैनंदिन गरजांसाठी इंधन कसे मिळवावे, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.









