---Advertisement---
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथील माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेल्या संतोष देशमुख प्रकरणाची आठवण होत असून, अशीच घटना कोल्हापूरमध्ये घडली का अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महेश पिळणकर अचानक बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी विविध बाजूंनी तपास सुरू केला असला तरी दोन महिन्यांनंतरही त्यांच्या बाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नेमकं काय झालं, ते कुठे आहेत, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पाटगाव परिसरात जळालेल्या अवस्थेत काही हाडं सापडल्याची घटना समोर आली होती. या हाडांचा अहवाल अद्याप आलेला नसला तरी प्राथमिक माहितीनुसार ती एखाद्या जनावराची असू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र तरीही महेश पिळणकर यांचा अद्याप कोणताही मागमूस लागलेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
तपासात प्रगती होत नसल्याचा आरोप करत पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह काही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी तपासाला गती द्यावी आणि लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांनी पोलिसांना सर्व प्रकारची माहिती दिली असूनही तपासात अपेक्षित वेग दिसत नाही तसेच पोलिसांकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. बीडमधील मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली होती, मात्र कोल्हापूरमधील या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूरच्या पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यानंतर योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महेश पिळणकर हे पाटगाव परिसरातील लोकप्रिय सरपंच म्हणून ओळखले जात होते. स्थानिक राजकारणात त्यांची चांगली पकड होती आणि नुकत्याच होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीत ते सक्रिय असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय तसेच इतर सर्व शक्य बाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र पिळणकर यांचा ठावठिकाणा लागत नाही तोपर्यंत या प्रकरणाबाबतची अनिश्चितता कायम राहणार आहे.









