---Advertisement---
वेष बदलून भिक्षा मागण्याचा खळबळजनक प्रकार पिंपळनेर शहरामध्ये उघडकीस आला असून सदर बाब जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी तात्काळ पिंपळनेर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान सर्व महिला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील दधम या गावातील असून नाशिक कडून पिंपळनेर शहरामध्ये भिक्षा मागण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या भागात फिरत होत्या. सदर सर्व ६ महिलांनी आपला वेश बदलला व बुरखा परिधान करून भिक्षा मागितली.

यासोबतच कोणत्याही प्रकारचे दिव्यांगत्व नसतानाही त्यांनी दिव्यांग असल्याचा बनाव केला.दरम्यान सदर प्रकरण पोलीसात पोहोचल्यानंतर सर्व ६ महिलांची कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर हे भिक्षुक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून सोमवारी रात्री धुळे येथील ममता वस्तीगृहात पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आले आहे.
“अलीकडच्या काळात मुले चोरून नेणाऱ्या टोळक्या सक्रिय असल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत त्याच अनुषंगाने पिंपळनेर शहरात आढळलेल्या या महिलाही त्याच प्रकारच्या कारवायांना चालना देत असाव्यात असा संशय नागरिकांना बळवल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. या महिला चोरी करण्याच्या उद्देशाने शहरात फिरत नसून भीक्षा मागत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व काही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पिंपळनेर पोलिसांनी केले आहे.









