---Advertisement---
मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता.
धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत काही काळासाठी कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते आणि कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर सुरक्षा तपास पूर्ण करत हळूहळू कर्मचाऱ्यांना पुन्हा आत सोडण्यात आले.

सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच अनेक व्हीआयपी व्यक्ती विधानभवन परिसरात येत-जात असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कोणताही धोका टाळण्यासाठी खबरदारी घेत परिसरात शोध मोहीम सुरू ठेवली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना संपूर्ण तपास होईपर्यंत अधिवेशन चालवू नये, अशी मागणी केली आहे. ही धमकी केवळ भीती निर्माण करण्यासाठी आहे की यामागे काही गंभीर कट आहे, याचा सखोल तपास झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांकडून सध्या धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असून सायबर पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.









