---Advertisement---
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणला भारताकडून मानवतावादी मदत मिळाली आहे. भारताने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पहिला साठा इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द केला आहे. भारतातील इराणी दूतावासाने याची माहिती देत भारतीय जनतेचे आभार मानले आहेत.
भारतामधील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनी दिल्ली-तेहरान संबंधांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. त्यांनी भारताला विश्वासू मित्र देश म्हणून संबोधले आणि दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परपूरक असल्याचे नमूद केले. फथाली यांनी असेही सांगितले की, वैद्यकीय मदतीपूर्वीही भारताने जहाजांद्वारे इराणला सहाय्य केले होते आणि त्यांच्या विनंत्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. काही इतर देशांनी मात्र सहकार्य नाकारल्याचे त्यांनी सूचित केले आणि अशा वागणुकीला इराण योग्य उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इराणी दूतावासाने १५ मार्च रोजी X वर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले होते की, इराणमधील प्रभावित नागरिकांसाठी मदत पाठवण्याबाबत अनेक भारतीयांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार, नवी दिल्लीत निधी जमा करण्यासाठी एक बँक खाते उघडण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन व्यवहार करताना अडचणी येत असल्याचे दूतावासाने नमूद केले आहे.
या अडचणी लवकरच दूर होतील, असा विश्वास दूतावासाने व्यक्त केला आहे. तोपर्यंत लोकांनी GPay द्वारे पैसे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांनी थेट दूतावासात जाऊन रोख स्वरूपात मदत जमा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.









