रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; बडनेरा-नाशिक रोड विशेष मेमूची मुदत 15 जुलैपर्यंत वाढली…!

---Advertisement---

 

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, बडनेरा-नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित मेमू गाडीची मुदत आता 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, या गाडीमुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

ही मेमू गाडी सकाळी 10.05 वाजता बडनेरा येथून सुटते आणि दुपारी सुमारे 12 वाजता शेगाव येथे पोहोचते. त्यामुळे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची ठरते. याशिवाय भुसावळ, जळगाव आणि नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही हा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.

गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित विशेष मेमू तसेच गाडी क्रमांक 01212 नाशिक रोड-बडनेरा मेमू या दोन्ही गाड्यांचा कालावधी 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच नियोजित वेळेनुसार सेवा मिळणार आहे.

ही मेमू गाडी बडनेराहून सुटून नाशिक रोडपर्यंत सायंकाळी 7.05 वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात नाशिक रोडहून रात्री 9.15 वाजता सुटणारी गाडी पहाटे 4.35 वाजता बडनेरा येथे पोहोचते. या गाडीला एकूण 8 डबे असून मार्गातील मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा दिला जातो.

विशेष म्हणजे, ही गाडी पहाटे नाशिक रोडहून बडनेरात आल्यानंतर देखभाल आणि स्वच्छतेसाठी अमरावती रेल्वे स्थानकावर आणली जाते. सकाळी सुमारे 9.30 वाजता ती अमरावतीहून बडनेराकडे रवाना होते. त्यामुळे काही प्रवासी थेट अमरावती स्टेशनवरूनच या गाडीत बसण्याचा पर्याय निवडतात.

दरम्यान, बडनेरा-नाशिक रोड मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या मेमू गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढती मागणी लक्षात घेता ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---