शिंदखेडा- पेडकाई मातेचा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमी ते पौर्णिमेपर्यंत येथे भव्य यात्रा उत्सव….!

---Advertisement---

 

खानदेशातील धार्मिक श्रद्धेचे केंद्र मानले जाणारे पेडकाई मातेचं भव्य मंदिर सध्या भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सोनगीर-दोंडाईचा मार्गालगत डोंगरावर वसलेले हे मंदिर सुमारे पाच एकर परिसरात पसरलेले असून, निसर्गरम्य वातावरणामुळे येथे येणाऱ्यांना आध्यात्मिक समाधान मिळते.

श्री पेडकाई माता ही खानदेशातील सुमारे ३२ कुळ-गोत्रांची कुलस्वामिनी मानली जाते. स्थानिक परंपरेनुसार, या सर्व कुळांचे पूर्वज याच परिसरात वास्तव्यास होते. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या देवीबद्दल अनेक धार्मिक आख्यायिका प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाच्या काळात याच मार्गाने गेले होते. डोंगरावर असलेली पाच कुंडे आणि पाऊलखुणा आजही भाविक श्रद्धेने पाहतात.

या मंदिराचा जीर्णोद्धार २००१ ते २०१३ या कालावधीत करण्यात आला. मंदिराचा सात फूट उंच धातूचा कळस असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्यात आला असून सुमारे ५०० फूट उंचीवर असलेल्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकही पायरी नाही. मंदिराची रचना गरुड पक्ष्याप्रमाणे भासणारी असल्याने ती वास्तुशास्त्रीयदृष्ट्याही वेगळी ठरते.

मंदिर दोन टप्प्यांत विभागलेले आहे. वरच्या भागात श्री पेडकाई मातेचे मुख्य मंदिर असून खालच्या भागात तिचे बंधू पेडोबा यांचे स्थान आणि श्री गणेश मंदिर आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी ओटा, तसेच इतर सुविधा उपलब्ध आहेत.

दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमी ते पौर्णिमेपर्यंत येथे भव्य यात्रा उत्सव भरतो. या काळात राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गर्दी इतकी मोठी असते की दर्शनासाठी पाच ते सहा तास रांगेत थांबावे लागते. देवीला गोड पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

या ठिकाणी नवस फेडण्यासाठी लहान मुलांचे जाऊळ देण्याची प्रथा देखील प्रचलित आहे. तसेच अंजनाच्या झाडांबाबत विशेष श्रद्धा असून, त्या लाकडाचा वापर करणे निषिद्ध मानले जाते.

दरम्यान, या मंदिर परिसराचा पर्यटनस्थळ म्हणूनही विकास होत असून, रस्ते आणि सभा मंडप यांसारख्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. धार्मिक श्रद्धा, निसर्गसौंदर्य आणि अनोख्या परंपरांचा संगम असलेले पेडकाई देवीचं हे मंदिर खानदेशातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---