केळीची वाहतूक करणारे वाहन पलटी होऊन भीषण अपघात; आठ मजूर गंभीर जखमी…!

---Advertisement---

 

तळोदा तालुक्यातील दसवड येथे केळीची वाहतूक करणारे वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी उलटल्यानंतर मजुरांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला. सर्व जखमी हे रोझवा येथील रहिवासी असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, केळी भरून जाणारे वाहन दसवड परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते अचानक पलटी झाले. या वाहनात केळीसोबतच मजूरही प्रवास करत होते. गाडी उलटल्याने मजूर केळीच्या घडांखाली आणि वाहनाखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढले.

या अपघातात शिवाजी राघव पाडवी ( वय ३५), दशरथ नोरा पावरा (वय ३०),महेश भरत पावरा (वय १८),प्रिया सुभाष पावरा (वय १८) गोरमी मोना पावरा (वय २०),सुरमिंग राण्या वसावे (वय २०),मास एजाज बागवान (वय १९),रविंद बामण्या पावरा (वय २५) असे एकूण ८ जण जखमी झाले आहेत.

​अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेअसून प्राथमिक उपचार केल्यानंतर, काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील तसेच अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, मालवाहू वाहनातून मजुरांची वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे वाहनचालकांनी आणि मजुरांनी प्रवासादरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---