रोहित शर्माने स्वतःचाच रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास !

---Advertisement---

 

मुंबई : आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला लक्षवेधी विजय मिळवून दिला. आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. विशेष म्हणजे, त्याने आयपीएलमधील स्वतःचाच सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडत नवा टप्पा गाठला.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर मध्ये ४ विकेट्स गमावत २२० धावा करत, मुंबई इंडियन्स समोर २२१ धावांचं लक्ष्य ठेवलं . हे लक्ष्य गाठणे सोपे नव्हते, त्यामुळे सुरुवातीलाच जोरदार सुरुवात होणे गरजेचे होते. सलामीला उतरलेल्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. सुरुवातीच्या दोन ओव्हर सोडल्या तर त्यांनी सतत आक्रमक फलंदाजी करत धावगती टिकवून ठेवली.

दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी झाली, जी मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी ठरली. पहिल्या विकेटसाठीच्या भागीदारींच्या यादीतही ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. याआधी २०१२ साली रोहित शर्मा आणि हर्शेल गिब्स यांनी १६७ धावांची नाबाद भागीदारी केली होती, तर त्याच वर्षी सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांनी १६३ धावा जोडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रोहित आणि रिकल्टनची भागीदारी महत्त्वाची ठरली.

रोहित शर्मा या सामन्यात शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचेल असे वाटत असताना तो त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र, त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत नवा विक्रम नोंदवला. यापूर्वी २०१५ मध्ये ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने २५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात त्याने ३८ चेंडूत ७८ धावा केल्या, ज्यात सहा षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट २०० च्या पुढे होता.

पहिल्याच सामन्यात रोहितची ही प्रभावी खेळी मुंबई इंडियन्ससाठी सकारात्मक संकेत देणारी ठरली. पुढील सामन्यांमध्येही त्याच्याकडून अशीच कामगिरी कायम राहिल्यास संघाच्या यशाच्या शक्यता अधिक मजबूत होतील.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---