---Advertisement---
कृष्णराज पाटील, जळगाव : राज्यात विशेषता जळगाव जिल्ह्यासह खानदेशात सद्यस्थितीत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तापमान सरासरी ४० ते ४२ अंशापर्यंत असून वाढत्या उष्णतेमुळे प्रकल्पांमध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. तसेच सिंचन, औद्योगीक वापरासह पेयजलासाठीच्या आवर्तनाव्दारे प्रकल्पामधील पाण्याची अमाप उचल होत आहे. परिणामी प्रकल्पांमधील पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक प्रमुख धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला असून, ५० टक्क्यांहून अधिक धरणे निम्मी रिकामी झाली आहेत.
जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठ्यात यंदा प्रचंड घट झाली आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव व चाळीसगाव या तालुक्यांच्या सीमेवर गिरणा प्रकल्प आहे. खानदेशातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून गिरणा प्रकल्पाची ओळख असून तब्बल
१८.४८७ टिएमसी अर्थात ५२३.५५दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता आहे. गिरणा प्रकल्प भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्याला आहे.
दिड महिन्यात गिरणा व हतनूरमध्ये सरासरी २२ टक्के घट
ऑक्टोबर मान्सून २०२५ दरम्यान १०० टक्के जलसाठा असलेल्या प्रकल्पातून आतापर्यत तीन आवर्तने देण्यात आली आहेत. तीन आवर्तनातून सरासरी ५८ टक्के जलसाठयाचा वापर झाला असून सद्यस्थितीत गिरणा प्रकल्प पातळी २१८.०१ दशलक्ष घनमीटर अर्थात ७.७० टिएमसी नुसार ४१.६४ टक्क्यांपर्यंत आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. १७ फेब्रुवारी रोजी गिरणा प्रकल्पात ६३.४७ टक्के जलसाठा होता. तर २ एप्रिल रोजी जलपातळी ४१.६४ टक्क्यांवर असून दिड महिन्यात सरासरी २२ टक्के घट झाली आहे. उर्वरित शिल्लक पाणीसाठा आणि पुढे आगामी मे आणि जूनमध्ये वाढते तापमान पहाता जलसाठ्यात प्रचंड प्रमाणात झपाटयाने घट होण्याची शक्यता असून, जून जुलैमध्ये मोठी कम तरता भासू शकते.
हतनूर प्रकल्प : तापी नदीवरील हतनूर प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २५५ दशलक्ष घनमीटर अर्थात ९.००४ टिएमसी असून मान्सून अखेरपर्यत १००% साठा होता. या प्रकल्पातून देखील भुसावळ, धरणगाव, अमळनेर शहरांसाठी पाणीपुरवठा तसेच सिंचनासाठी तीन आवर्तने देण्यात आली असून सद्यस्थितीत १३६.० दशलक्ष घनमीटर अर्थात ४.८० टिएमसी पाणीसाठा असून औद्योगीक वापरासह सिंचन व पेयजलासाठी उचल झाली असल्याने पाणीसाठ्यात आतापर्यंत चार महिन्यात सरासरी ४७ टक्के घट झाली आहे.
जळगाव शहराला दोन वर्षे पुरेल असा वाघूरचा पाणीसाठा
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पाची क्षमता २४८.५५ ददशलक्ष घनमीटर अर्थात ८.७७६ टिएमसी असून सद्यस्थितीत ७९.६८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून किमान दोन वर्ष पाणीसाठा पुरेल असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पात ५२ टक्क्याहून अधिक साठा
जिल्ह्यात गिरणा ४१.६४, हतनूर ५३.३३ आणि वाघूर ७९.६८ टक्के असा ३ मोठ्या प्रकल्पात जलसाठा आहे. यात तीन मोठे, १४ मध्यम आणि ९६ लघू असे ११३ प्रकल्पांची साठवण क्षमता सरासरी १५३७.८५ दशलक्ष घनमीटर अर्थात ५४.३०३ टिएमसी असून सद्यस्थितीत ८०९.९४ दशलक्ष घनमीटरनुसार २८.६० टिएमसीनुसार सरासरी ५२.६७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील १४ मध्यम आणि ६९ लघू प्रकल्पापैकी बोरी १९.९२, हिवरा ३१.०८, मन्याड ३४.६७, भोकरबारी ४२.८०, तोंडापूर ४४.७६, बहुळा ५०.६४, अग्नावती ५६.६७, मंगरूळ ५७.५६, अंजनी ५९.६७, शेळगाव बॅरेज ६५.२७, गुळ ६६.२१, अभोरा ७६.२२, मोर ७७.०८, सुकी ७७.६३ टक्केनुसार एकूण मध्यम आणि लघू प्रकल्पात ८०९.९४ दशलक्ष घनमीटर अर्थात २८.६० टिएमसीनुसार सरासरी ५२.६७ टक्के उपयुक्त जलसाठा आजच्या स्थितीत आहे.
शिल्लक पाणीसाठयाचा जपून वापर करण्याचे आव्हान
प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून पाणी जपून वापरण्याचे आणि साठा मर्यादित ठेवण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. गिरणा प्रकल्पातून सिंचनाचे आवर्तन संपले असून आता केवळ दोन आवर्तने पेयजलाची आहेत. त्यानुसार प्रकल्प प्रशासनाने प्रकल्पांमधील पाण्याचे लेखापरीक्षण करणे आणि पाणी टंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– विनोद पाटील. कार्यकारी अभियंता, गिरणा प्रकल्प पाटबंधारे विभाग जळगाव









