---Advertisement---
धुळे, दि. ३ (प्रतिनिधी) : गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य समर्पित केलेल्या उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रामधीरज बालेश्वरजी सिंग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचा सन्मान रविवारी, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता धुळे येथील बर्वे छात्रालयात होणाऱ्या विशेष सोहळ्यात केला जाणार आहे.
या कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे आणि धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘साम्यकदर्शन’चे संपादक रमेश दाणे राहणार आहेत. तसेच जळगाव येथील हरिजन सेवक संघाचे शंभू पाटील ‘महात्मा गांधी आणि अहिंसा’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत.
मालेगाव येथील महाराष्ट्र गो विज्ञान समितीतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन (गांधीतीर्थ) यांच्या पुरस्कारा अंतर्गत दिला जातो. सर्वोदयी कार्यकर्त्यांमध्ये या पुरस्काराला विशेष मानाचे स्थान आहे. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. यावेळी रामधीरजजी यांच्या कार्याचा आढावा घेणारा लघुपटही सादर केला जाणार आहे.
या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव आणि महाराष्ट्र गो विज्ञान समिती, मालेगाव यांनी केले आहे.
रामधीरजजी सिंग यांचा परिचय
रामधीरज बालेश्वरजी सिंग यांचा जन्म १४ डिसेंबर १९५४ रोजी वाराणसी जिल्ह्यातील कोरी (सध्याचे चंदौली) येथे झाला. त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. बालपणापासून गांधीवादी विचारांचा प्रभाव असलेल्या रामधीरजजींनी १९७४ मधील जयप्रकाश नारायण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात त्यांनी १८ महिन्यांचा कारावास भोगला.
विद्यार्थी आणि किसान आंदोलनात सक्रिय राहून त्यांनी १९८९ मध्ये ‘आज़ादी बचाओ आंदोलन’ आणि ‘लोक स्वराज अभियान’ सुरू केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांविरोधात स्वदेशी चळवळ उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, वाराणसीतील वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत. गांधीवादी मूल्यांचा अंगीकार हाच सामाजिक परिवर्तनाचा मार्ग असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे.









