---Advertisement---
खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गुजरात ते ओडिशा जोडणारी उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता आठवड्याचे सर्व दिवस म्हणजेच दररोज धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जात होती. मात्र प्रवाशांकडून मिळालेला प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन गाडी दररोज चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खानदेशातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सुरत व औद्योगिक भागात प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची मानली जाते. आता ती दररोज उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सुलभ आणि नियोजित होणार आहे.
ह्या गाडीला अप आणि डाऊन मार्गावर बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांताबंजी, तितला आदी स्थानकांवर थांबणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही गाडी सोयीस्कर पर्याय ठरत असून प्रतीक्षा यादीतही घट होण्याची शक्यता आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक 19021 उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस जी सध्या आठवड्यातून तीन दिवस सुटते, ती आता दररोज धावेल. तसेच गाडी क्रमांक 19022 ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेसही दररोज चालवली जाणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे खान्देशातील हजारो प्रवाशांच्या प्रवासाला मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.









