---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ आणि ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे अभियान १८ मे ते २५ मे २०२६ दरम्यान जिल्ह्यातील विविध भागांत राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अभियानाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘सर्वात दूर, सर्वात पहिले’ या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा मुख्य उद्देश आदिवासी समाजापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा १०० टक्के लाभ पोहोचविणे हा आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आदिवासी समाजाचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
या अभियानासाठी आयोजित बैठकीत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि ११२ गावांचे ग्रामसेवक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यातील ११२ गावांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविले जाणार आहे.
अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, सिकल सेल जनजागृती, पोषण अभियान, जनसुनावणी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गावपातळीवर ‘आदिवासी सेवा केंद्र’ सुरू करून तक्रार निवारण, हक्कांविषयी जनजागृती आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच २० मे रोजी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
याशिवाय महिला बचत गटांसाठी आर्थिक सक्षमीकरण मार्गदर्शन, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगारविषयक मार्गदर्शन, तसेच आदिवासी उद्योजकांच्या यशोगाथांचे दस्तऐवजीकरण करून त्यांना बाजारपेठेशी जोडण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी लाभार्थी संतृप्ती आणि आरोग्य सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या.









