---Advertisement---
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासोबत दिली चुल्ह्यावरील भाकरी-भाजी भेट
गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, स्मार्ट मीटर आणि NEET परीक्षेतील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती पार्टी तर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चुल्हा जलाओ आंदोलन” करण्यात आले. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात हे आंदोलन पार पडले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच घरेलू व व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक त्रस्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी घोषित केलेल्या तीन टप्प्यातील आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी ३१ मे रोजी “धक्का मारो आंदोलन” करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष सुनिल देहडे, राज्य कोषाध्यक्ष विनोद अडकमोल आणि राज्य संघटक प्रमोद सौंदणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चुलीवर तयार केलेली भाकरी आणि भाजी प्रतीकात्मक स्वरूपात भेट दिली.
या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.









