---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात शासकीय धान्य खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून विविध गावांमधील शेतकरी नोंदणीसाठी रांगेत उभे असून अनेकांना मुक्काम करावा लागत असल्याचे चित्र आहे.
नोंदणी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्यामुळे चार दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी संघटनांनीही प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
धान्य खरेदीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी तसेच खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने चेंगराचेंगरीचा धोका निर्माण झाला असून परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आज सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
त्रस्त शेतकरी:
“चार दिवसांपासून इथेच थांबलो आहोत, पण अजून नोंदणी झाली नाही. आमचं मोठं नुकसान होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.”









