दारूच्या नशेत चुलत भावाने भावाच्या डोक्यात केला आसारीने वार, तरुण जखमी; पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील घटना…!

---Advertisement---

 

पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावात कौटुंबिक वादातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या चुलत भावाला समजावण्यासाठी गेलेल्या तरुणावर लोखंडी आसारीने हल्ला करण्यात आला असून, या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी अनिल भिका साळुंखे हे शिंदाड येथील रहिवासी असून ते आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे गावात सलूनचे दुकान आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ सूरज अशोक साळुंखे हा दारूच्या नशेत त्यांच्या घरी येऊन अनिल यांच्या पत्नीला विनाकारण शिवीगाळ करत होता.

ही बाब लक्षात येताच अनिल साळुंखे यांनी सूरजला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी “तू शिवीगाळ का करतोस?” असा जाब विचारला. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने आरोपी सूरज साळुंखे याने संतापाच्या भरात जवळ असलेल्या लोखंडी आसारीने अनिल साळुंखे यांच्या डोक्यात जोरदार वार केला.

या हल्ल्यात अनिल साळुंखे जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. घटनेनंतर आरोपीने पीडित व त्यांच्या पत्नीला धमकी देत “मी फाशी घेऊन तुम्हाला त्यात अडकवेन” असेही सांगितल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

या घटनेनंतर अनिल साळुंखे यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार आरोपी सूरज अशोक साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसांकडून सुरू असून, अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शिंदाड गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कौटुंबिक वादातून झालेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---