---Advertisement---
जळगाव (दि. ९ एप्रिल २०२६) – शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील सार्वजनिक रस्ता व आरक्षित खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत रहिवाशांनी आयुक्तांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, लक्ष्मी नगर परिसरातील सदर जागा ही पूर्वीपासून सार्वजनिक वापरासाठी असून, नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा वापर करत आहेत. तसेच गट क्रमांक ३३२ व ३३१/५/१ मधील काही भाग हा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या काही व्यक्तींनी या ठिकाणी अतिक्रमण करून रस्ता अरुंद केला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामुळे दैनंदिन वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना ये-जा करणे कठीण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी २०१२, २०१५, २०१८, २०२२ आणि २०२३ या वर्षांतही याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सदर अतिक्रमण तात्काळ हटवून सार्वजनिक रस्ता मोकळा करावा तसेच आरक्षित खेळाचे मैदान मूळ स्वरूपात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे.









