---Advertisement---
चाळीसगाव शहरात घडलेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील रेल्वे पुलावर हा अपघात घडला. अर्जुन अनिल नरवाडे हे आपल्या पत्नी पूनम नरवाडे यांच्यासह बाजार करून घरी परतत होते. याचदरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अर्जुन नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पूनम नरवाडे या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, त्या ठिकाणावरून जात असलेले चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून नागरिकांच्या मदतीने जखमींना ऍम्बुलन्सद्वारे रुग्णालयात पाठवले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत उपचार मिळू शकले. नरवाडे दाम्पत्य हे मूळ जामनेर येथील रहिवासी असून, कामानिमित्त ते चाळीसगावातील डेराबर्डी परिसरात वास्तव्यास होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास सुरू आहे









