---Advertisement---
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः शिरसोली परिसरातील विड्याच्या पानमळ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
पानमळे ही अत्यंत नाजूक आणि काळजीपूर्वक जपावी लागणारी शेती असल्याने वादळी वारे आणि गारपिटीमुळे संपूर्ण मळे उध्वस्त झाले. मात्र, या पानमळ्यांचा शासकीय योजनांमध्ये समावेश नसल्याने पान उत्पादक शेतकरी पंचनामे आणि नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत.
जिल्ह्यातील बारी समाज पारंपरिक पद्धतीने पानमळ्यांची शेती करतो. या शेतीवरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु, यंदाच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतरही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, इतर पिकांप्रमाणेच पानमळ्यांच्या नुकसानीचाही पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी. यामुळे त्यांना पुन्हा शेती उभी करण्यासाठी मदत होईल.
दरम्यान, या परिस्थितीचा आढावा घेत आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी प्रभावित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी करत, पानमळ्यांना शासकीय योजनांमध्ये समाविष्ट करण्याची गरज व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांची मुख्य मागणी
पानमळ्यांचा शासकीय योजनेत समावेश करावा
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
पान उत्पादकांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी
सध्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले असून, लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









